Skip to main content

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर जन्मदिन


लक्ष्मणराव किर्लोस्कर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द उद्योगपती व कारखानदार, किर्लोस्कर उद्योगसमुहाचे मुख्य प्रवर्तक. त्यांचा जन्म २० जून १८६९ रोजी झाला. महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड या नावाने गौरवण्यात आले आहे.
आज जगाचा वेग वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनक राईट बंधू आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर  या दोघांचाही जन्म एकाच काळातील आणि दोघांनीही प्रारंभी सायकलचेच दुकान चालवले. गेल्या शंभर वर्षांत हवेत उडण्याच्या माणसाच्या स्वप्नाचा एक प्रचंड मोठा उद्योग झाला आणि किर्लोस्करांनी लावलेल्या छोटय़ाशा रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर झाले.
१० मार्च १९१० रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल रोड या खेडेगावात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या उद्योगाला सुरुवात झाली. याच गावाचे नामकरण नंतर किर्लोस्करवाडी असे झाले. पण त्या जागेत सुरू झालेल्या एका उद्योगाला तेथील सगळय़ांच्या घामाने आणि लक्ष्मणरावांच्या कल्पकतेने झळाळी आली.
स्वातंत्र्यचळवळीचा एक भाग म्हणून स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्यांनी आपापल्या परीने चळवळीत योगदान दिले होते. लक्ष्मणरावांनी इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेल्या औद्यौगिक वसाहतींबद्दल वाचले होते. तसा प्रयत्न देशात करण्याचा त्यांचा मानस, औंध संस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी रेल्वेस्थानकाजवळ असलेली जागा देणगी म्हणून दिल्याने आकाराला आला. सुनियोजित पद्धतीने किर्लोस्करांनी कारखान्याची उभारणी केली. त्या काळात सगळय़ांना वेगळे वाटेल, असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांनी या भागात निवासाची उत्तम व्यवस्था निर्माण केली. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी माध्यमिक शाळाही सुरू केली. खेळांची उत्तम व्यवस्था हेही या गावाचे एक वैशिष्टय़ ठरले. क्रिकेट क्लब, गोल्फ क्लब, टेनिस कोर्ट, पोहण्याचा तलाव अशा अनेक सुविधा या भागात होत्या. किर्लोस्करांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना तेथे राहणे सुखकर व्हावे, याकडे लक्ष्मणरावांचा कटाक्ष असे. स्वतंत्र पोस्ट कार्यालय हेही या गावाचे वेगळेपण ठरले होते.
त्या काळातील क्रमांक दोनचा औद्योगिक परिसर (पहिला क्रमांक जमशेदपूरचा.) म्हणून किर्लोस्करवाडीला मिळालेला मान हा या सगळ्या कल्पनांचाच गौरव  आहे. कारखाना सुरू करण्याची मराठी माणसाची तयारी नसते, मराठी माणूस नोकरी करण्यात जास्त रस घेतो, हे समज खोटे ठरावेत, असे काम लक्ष्मणराव किर्लोस्करांनी करून दाखवले. कोणत्याही स्थितीत कारखान्यातील उत्पादनाचा दर्जा घसरता कामा नये, यासाठी लक्ष्मणरावांची धडपड असे.
लक्ष्मणरावांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले, तरी त्यांची स्वप्ने फार मोठी होती. लहानपणापासून परिसरात दिसत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या. शेतकऱ्यांसाठी नवी उपकरणे तयार करणे हे त्यांचे ध्येय होते. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी जी उपकरणे बनवली, त्याला शेतकऱ्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला. किर्लोस्करांनी तयार केलेला लोखंडी नांगर प्रत्येक शेतकऱ्यासाठी मोलाचा ठरला आणि भारतातील शेतकऱ्यांच्या तोंडी किर्लोस्कर हे नाव तात्काळ रुळले. किर्लोस्कर पंप हे तर देशातील शेतांवर हमखास दिसणारे यंत्र असे. शेतकऱ्यांचे जगणे सुखकर व्हावे, हा लक्ष्मणरावांचा ध्यास होता.
एखादा उद्योग सुरू झाला तरी तो पुढे सुरू राहणे आणि त्याचा विकास होणे यासाठी पुढची पिढी कर्तबगार असावी लागते. लक्ष्मणराव त्याबाबत नशीबवान ठरले. शंतनुरावांनी आपल्या कर्तृत्वाने हा उद्योग मोठा केला आणि देशातील कानाकोपऱ्यात त्याची उत्पादने पोहोचवली. केवळ उद्योगापुरते किर्लोस्कर हे नाव अग्रेसर राहिले नाही, तर किर्लोस्कर मनोहर आणि स्त्री यांसारखी नियतकालिके हीही त्यांची एक वेगळी ओळख ठरली. मराठी पत्रकारितेमध्ये या नियतकालिकांचे योगदान फार मोलाचे आहे. साऱ्या देशात उद्योगांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बिनीच्या उद्योगपतींमध्ये लक्ष्मणरावांचे आणि त्यांच्या किर्लोस्कर उद्योगसमूहाचे नाव अग्रेसर राहिले आहे.
त्यांचा मृत्यु २६ सप्टेंबर १९५६ ला झाला.
सौजन्य-marathisrushti.com

Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

पु.ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे  ( नोव्हेंबर ८ ,  इ.स. १९१९  -  जून १२ ,  इ.स. २००० ) हे लोकप्रिय  मराठी   लेखक ,  नाटककार ,  नट , कथा व  पटकथाकार ,  दिग्दर्शक  आणि  संगीत दिग्दर्शक  होते. त्यांना  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व  असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने  पु. ल.  म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ  ऋग्वेदी  हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. जीवन गावदेवी, मुंबईत जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या  फर्ग्युसन महाविद्यालयात  आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली  सुनीताबाईंशी  विवाहबद्ध झाले. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी...

कुसुमावती देशपांडे

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘...