पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ( नोव्हेंबर ८ , इ.स. १९१९ - जून १२ , इ.स. २००० ) हे लोकप्रिय मराठी लेखक , नाटककार , नट , कथा व पटकथाकार , दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. जीवन गावदेवी, मुंबईत जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी...